नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट
अजूनही अनेक विद्यार्थी ‘अपार आयडी’ च्या प्रतिक्षेत
हरिभाऊ लाखे
नाशिक : बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. त्यातही सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी विभागामार्फत घेतली जाणारी परीक्षा देणे आवश्यक असते. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन’ (अपार) आयडी काढणे बंधनकारक आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार नसल्याने या विद्यार्थ्यांसमोर वेगळाच धोका निर्माण झाला आहे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अपार आयडी ही संकल्पना पुढे आली आहे. अपार आयडी संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६पर्यंत शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. राज्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एकूण २ कोटी १५ लाख ४५ हजार १९४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षेचा अर्ज अपार आयडी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. नाशिक प्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश विभागातही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रक्रियेबाहेर राहिल्याने शिक्षण विभागाने शाळास्तरावर विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी आवश्यक झाला आहे.
अपार आयडी प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. आधार प्रमाणीकरण हा सर्वात मोठा अडथळा असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात साडेपाच लाखापेक्षा अधिक अर्ज काही त्रुटींअभावी अपार अयाडीसाठी पात्र ठरलेले नाहीत. आधार पडताळणी न होणे, नाव आणि जन्मतारीख न जुळणे, पालकांची संमती न मिळणे, अशा काही प्रमुख कारणांचा त्यात समावेश असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
राज्यात पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये बारावीची राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात होईल. बारावीनंतर विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवरील ताण वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्यात अजूनही अपार आयडीविना बारावीचे आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बाकी आहेत. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, त्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत अपार आयडी तयार न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान सीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या ८९.१६ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. परंतु, अजूनही आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार होणे बाकी आहेत. अपार आयडी तयार करण्यासाठी ३१ जानेवारी ही मुदत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आली आहे. अपार आयडी तयार करण्याच्या कामात राज्यभरात होणाऱ्या महापालिका निवडणूक कामांचा अडथळा आल्याचा शिक्षकांचा दावा आहे.
