टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६

मुंबई, १३ जानेवारी : टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) २०२६ ने यंदा समाजोपयोगी निधी संकलनात नवा विक्रम प्रस्थापित केला असून, स्पर्धेच्या प्रत्यक्ष शर्यतीपूर्वीच तब्बल ५३.७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. युनायटेड वे मुंबई या फिलान्थ्रॉपी पार्टनरच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधिक गती मिळण्याची शक्यता असून, यंदाची आवृत्ती मॅरेथॉनच्या इतिहासातील सर्वात प्रभावी समाजसेवी उपक्रमांपैकी एक ठरत आहे.
यंदा विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच निधी संकलन करणाऱ्या फंडरेझर्सची विक्रमी संख्या. शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि समुदाय विकास अशा विविध सामाजिक कारणांसाठी नव्या फंडरेझर्सनी पुढाकार घेतला आहे. एकूण सहभागी फंडरेझर्सपैकी जवळपास ७५ टक्के म्हणजे १,१०० हून अधिक फंडरेझर्स हे नवखे असून, त्यांनी आतापर्यंत ५.६ कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे.
२००४ पासून आतापर्यंत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून एकूण ५३६ कोटी रुपयांहून अधिक निधी संकलित करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, धावपटू आणि वैयक्तिक देणगीदार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा सामाजिक ठेवा उभा राहिला आहे.
यंदा कॉर्पोरेट सहभागातही मोठी वाढ झाली आहे. १९४ कॉर्पोरेट संघ यंदा सहभागी झाले असून, त्यातील ४० कंपन्या प्रथमच मॅरेथॉनच्या समाजसेवी उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच ६८ नव्या स्वयंसेवी संस्था यंदा सहभागी झाल्याने एकूण सहभागी एनजीओंची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. हे या व्यासपीठावरील विश्वासार्हता आणि परिणामकारकतेचे द्योतक असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रथमच निधी संकलन करणाऱ्या काही फंडरेझर्सनी आपले अनुभव मांडले. यामध्ये आर्यवीर झुंझुनवाला, हसीना थेमाली, समीर मेंगल, इरा खान आणि शांता वल्लुरी गांधी यांचा समावेश होता. अनेकांनी सुरुवातीचा संकोच, लोकांकडे मदतीसाठी हात पुढे करण्याचा अनुभव आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद याविषयी मनमोकळेपणाने सांगितले.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *