पोलीस सरंक्षण देण्याची पोलीस उपायुक्तांकडे केली मागणी 
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच माजी नगरसेवक तथा  शिवसेनेचे उपशहर प्रमुख यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस सरंक्षण देण्याची मागणी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे.
मोहन उगले हे माजी नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. केडीएमसी निवडणुकीसाठी त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षाच्या आदेशांनंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर देखील काही समाजकंटक व राजकीय विरोधक हे जीवे ठार मारण्याचा उद्देशाने रेकी करून ठीक ठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप मोहन उगले यांनी केला आहे. त्यामुळे या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ २४ तास दोन पोलीस अंगरक्षक १६ जानेवारी पर्यंत पुरविण्यात यावेत. यासाठी जो काही शासकीय रक्कम भरणा असेल तो भरण्यास तयार असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले.
०००००
बिनविरोध निवडणुकांबाबत मुंबई उच्च न्यायालयात PIL स्वीकारली
ठाणे : सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी दाखल केलेली जनहित याचिका (PIL) बॉम्बे उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारली आहे.  न्यायालयाने या प्रकरणी १४ जानेवारी रोजी सर्क्युलेशन मंजूर केले आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान न घेता उमेदवारांना बिनविरोध निवडून घोषित करण्याच्या पद्धतीला ही जनहित याचिका आव्हान देते. केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला तरीही मतदान घेणे बंधनकारक करावे, जेणेकरून नागरिकांना NOTA (नोटा) या पर्यायासह आपला लोकशाही हक्क बजावता येईल, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेत सहा महानगरपालिका प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुका बिनविरोध घोषित करण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला असून, अशा प्रकारांमुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही जनहित याचिका अ‍ॅड. विनोद उतेकर, अ‍ॅड. श्वेता सराफ व इतर यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे. अजय जेया यांनी सांगितले की, ही PIL लोकशाही मूल्ये बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *