५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण!
काझीपेठच्या रेल्वे ग्राउंडवर थरारक लढती; विजयी संघांची दिमाखात पुढील फेरीत झेप
काझीपेठ (तेलंगणा): येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेने पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली देशभरातील बलाढ्य संघांनी मैदानात उतरून कौशल्य, वेग, चपळाई आणि रणनीतीचा अफलातून संगम सादर केला. प्रारंभीच्या सामन्यांतच महाराष्ट्र, कोल्हापूर, रेल्वे आणि छत्तीसगड संघांनी जोरदार विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण केली आणि दिमाखात पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.
पुढील संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली पुरुष गट : महाराष्ट्र, रेल्वे, पुद्दुचेरी, उत्तर प्रदेश, कोल्हापूर, गुजरात, ओडिशा, विदर्भ, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा. महिला गट : महाराष्ट्र, ओडिशा, विदर्भ, विमानतळ, पंजाब, दिल्ली, राजस्थान, कोल्हापूर, गुजरात, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू
महिला गटात महाराष्ट्राचा डंका; उत्तर प्रदेशवर दणदणीत विजय
महिला गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर ४४–१० असा १ डाव ३४ गुणांनी दणदणीत विजय मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. ड्रीम रनद्वारे ८ गुण मिळवण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरला. महाराष्ट्राकडून सरीता दिवा (२.५० मि. संरक्षण व २ गुण), सुहानी धोत्रे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), रेश्मा राठोड (२ मि. संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (१.१० मि. संरक्षण व १४ गुण), संध्या सुरवसे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी मोलाची कामगिरी नोंदवली. उत्तर प्रदेशकडून अंजु यादव (१ मि. संरक्षण) व शिवानी (२ गुण) यांनी लढत दिली.
चंदीगडवर महाराष्ट्राची सरशी; महिलांचा दमदार खेळ
महिला गटातच महाराष्ट्राने चंदीगडचा ४२–१२ असा १ डाव ३० गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्वेता नवाले (१.५०, १.५० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (२.२० मि. संरक्षण व २ गुण), प्रियांका इंगळे (१.५० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. चंदीगडकडून रितू (१ मि. संरक्षण व २ गुण) हिने चांगली कामगिरी केली.
पुरुष गटात महाराष्ट्राची विजय घोषणा; उत्तर प्रदेश पराभूत
पुरुष गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर २५–१५ असा ५ मिनिटे राखून १० गुणांनी विजय मिळवला. महाराष्ट्राकडून सुयश गरगटे (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), निहार दुबळे (४ गुण), प्रतीक वायकर (२.०० मि. संरक्षण), ऋषिकेश मुर्चावडे (२.१० मि. संरक्षण) यांनी चमकदार कामगिरी केली. उत्तर प्रदेशकडून मोहित पाल (४ गुण), आशिष (२.० मि. संरक्षण व २ गुण), रोहित पाल (१.३० मि. नाबाद व २ गुण) यांनी एकाकी झुंज दिली.
जम्मू–काश्मीरवर महाराष्ट्राचा धुव्वा; मैदान गाजवले खेळाडूंनी
दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने जम्मू–काश्मीरचा ४८–१४ असा १ डाव ३४ गुणांनी धुव्वा उडवला. विजय शिंदे (२.५० मि., १.२० मि.), सुयश गरगटे (३.०० मि.), शुभम थोरात (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), रुद्र थोपटे व प्रतीक वायकर (प्रत्येकी ६ गुण) यांनी सामना आपल्या नावावर केला.
कोल्हापूरचा दमदार विजय; त्रिपुरा नामोहरम
पुरुष गटात कोल्हापूरने त्रिपुरावर ४९–६ असा १ डाव ४३ गुणांनी मात केली. कोल्हापूरकडून विराज गलगटे (१.४० मि. संरक्षण), राजवर्धन (२.१० मि. संरक्षण व २ गुण), मजहर जामदार (१० गुण) यांनी प्रभावी खेळ केला. त्रिपुराकडून सागर मिहा व अभिजी नाम्हे (प्रत्येकी २ गुण) यांनी आक्रमणात योगदान दिले.
महिला गटात कोल्हापूरची दणदणीत कामगिरी; बिहारवर मोठा विजय
महिला गटात कोल्हापूरने बिहारचा ५६–६ असा १ डाव ५० गुणांनी पराभव केला. अमृता बाबासो (१.२०, ३.४० मि. संरक्षण व १४ गुण), श्रावणी लक्ष्मुण (५.४० मि. संरक्षण व १० गुण), श्रेया राजगोंडा (६ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. बिहारकडून रिया रानी (१ मि. संरक्षण) हिने चांगली कामगिरी केली.
चुरशीची लढत; हरयाणा–मध्य भारत बरोबरीत
महिला गटात हरयाणा विरुद्ध मध्य भारत सामना २४–२४ असा बरोबरीत सुटला. हरयाणाकडून मनेश (२.२०, २.२० मि. संरक्षण व २ गुण), आंचल (३.१० मि. संरक्षण), खुशबू (६ गुण), काफी (६ गुण) यांनी चांगला खेळ केला. मध्य भारतकडून रोहिणी (३.२० मि. संरक्षण व ४ गुण), अक्षरा (१.५०, १.२० मि. संरक्षण), इशा (८ गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली.
संक्षिप्त गुणफलक; इतर रोमांचक निकाल
पुरुष गट: छत्तीसगडने ऑल इंडिया पोलीसवर २६–२५ असा १ गुणाने विजय; रेल्वे स्पोर्ट्स बोर्डने चंदीगडवर ४८–२० असा १ डाव २८ गुणांनी विजय.
महिला गट: कर्नाटकने पश्चिम बंगालवर २७–१८ असा ९ गुणांनी विजय, राजस्थानने तेलंगणावर २२–२० असा २ गुणांनी निसटता विजय, छत्तीसगडने उत्तर प्रदेशवर २४–१२ असा १२ गुणांनी विजय.
