२७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा

२७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडविणार
कल्याण : २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने २०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार पुकारला असून २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडवणार असल्याची भूमिका मांडत स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा उचलणाऱ्या मनसे, शिवसेना(उबाठा), काँग्रेस, एनसीपी (एसपी) पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीबाबत २७ गावांतील नागरिकांची भूमिका सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जो पर्यंत या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विरोधी पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र सत्ताधार्यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी २७ गावांच्या अस्मितेचा प्रश्न घेतला आहे हे समितीने पहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा प्रचारात मांडला आहे.
मात्र सत्ताधारी पक्षांना याबाबत गांभीर्य नसून, त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच कल्याण येथे झालेल्या सभेत २०१५ साली २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या दिलेल्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली असून एकाच गोष्टीसाठी दहा वर्षे पाठपुरावा करावा लागत आहे हि खेदाची बाब आहे. निवडणुकीनंतर संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर दबाव आणू, मात्र हा विषय नगरविकास खात्याकडे प्रलंबित असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. हा चेंडू त्यांच्या कोर्टात असून याबाबत शून्य टक्के समर्थन त्यांच्याकडून येत आहे. प्रचारात शिवसेनेचे उमेदवार २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात होते. त्यामुळे ज्या ज्या पक्षांनी स्वत्तान्त्र नगरपालिकेबाबत समर्थन दिले आहे त्यांच्या पाठीशी संघर्ष समिती आणि २७ गावांतील नागरिक उभे असून ज्यांनी हा मुद्दा घेतला नाही त्यांना मतदानाच्या दिवशी अद्दल घडविणार असल्याची भूमिका २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *