मुंबई : मतदानाच्या दिवशीच टपाली मतपेट्या उघडल्या. ही कसली लोकशाही आहे? विरोधक रडीचा डाव खेळतायेत असं मुख्यमंत्री म्हणतात मग निवडणूक आयुक्त त्यांचे घरगडी म्हणून काम करतायेत का? लोकशाहीची थट्टा करणाऱ्या या निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

साम, दाम, दंड भेद याचा वापर सगळीकडे सुरू आहे. महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही त्यामुळे निवडणुकीत वाट्टेल ते करा अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गणेश नाईक यांचे मतदान केंद्रच फरार झाले. ४ तास मतदान केंद्र शोधायला लागले. ही एका मंत्र्यांची अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीवर इलाज नसेल तर निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायेत आणि सत्ताधाऱ्यांसमोर लाचारी करतायेत. पुरुष मतदारां समोर महिलांचा फोटो आहे. मतदान केंद्रावर भाजपा उमेदवाराच्या पाट्याच दिसतायेत. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. वन नेशन, वन इलेक्शन त्यासाठी मोदींना हवं. एकाच वेळी सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे. निवडणूक आयोगाचा संपूर्ण स्टाफ रोज काय करत असतो त्याचा छडा लावला पाहिजे. बसल्या जागी पगार खातायेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठेवावे लागतील. तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल. कोर्टात जाऊन करणार काय, एकदा कोर्टात गेले की पुढे ४  ते ५ वर्ष सुरूच राहते. निवडणूक आयोग झोपेचे सोंग करतंय. हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *