सिंधुदुर्गात भाजपांतर्गत वाद उफाळला !
नारायण राणेंच्या विरोधात रविंद्र चव्हाण समर्थकांचे राजीनामा सत्र
जिल्हापरिषद निवडणूकीतील नारायण राणेंच्या निवडणूक फॉर्म्युलावर नाराजी ०
राजन चव्हाण
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गात एकीकडे खासदार नारायण राणे यांनी महायुती मधील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर २४ तासातच दुसरीकडे भाजपामधील राणे विरोधी गटाचा या फॉर्म्युलालाच नव्हे तर महायुतीलाही विरोध असल्याचे समोर आले आहे. मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर आज माजी मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष , विद्यमान मंडल अध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांच्यासह सुमारे ५० प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी आज घाईघाईने पक्षातील विविध पदांचे राजीनामे दिले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात महायुती होणार असे राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यामुळे त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची सूत्रे पुन्हा एकदा खासदार राणे यांच्याकडेच असणार हे स्पष्ट झाले होते.
महायुती झाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. याचं कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीच्या जवळपास सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमधील घटक पक्षांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रबळ इच्छुक आहेत काही मतदारसंघात तर संख्या अधिक आहे त्यामुळे उमेदवार ठरविणे हे सोपे असणार नाही आणि म्हणूनच महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार निवडीचे सर्वाधिकार खासदार राणे यांना देण्यात आल्याचे समजते.आणि त्यानुसार जागा वाटप व उमेदवार निश्चितीबाबतचे सर्व निर्णय राणेच घेणार हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्या प्रमाणे राणे यांनी आज महायुतीच्या घटक पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला आज सकाळी एका पत्रकार परिषद जाहीर केला.
हा फॉर्म्युला आज जाहीर होताच लगेचच भाजपांतर्गत राजीनामा सत्र सुरू झाले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना आजच पाठवलेल्या पत्रात भाई सावंत यांनी मंडल अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला आता उचित वाटत नाही तरी माझा हा राजीनामा त्वरित स्वीकारावा असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
सावंत यांच्याबरोबरच नुकतेच ऊबाठा सेनेतून भाजपामध्ये प्रवेश केलेले जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश (छोटू ) पारकर, जि.प.चे माजी सभापती लॉरेन्स मानयेकर, जिल्हा व युवा मोर्चा उपाध्यक्ष हार्दिक शिगले, आधी सुमारे ५० जणांचा समावेश आहे.
या राजीनामा नाट्यामुळे जिल्हा भाजपा आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लवकरच जिल्ह्यातील आणखी काही पदाधिकारी, मंडल आणि बूथ पातळीवरचे पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. यावर जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
