जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज!
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…!
सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व मदतीसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येकी दोन याप्रमाणे १६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार आहेत त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मतदान करणार त्याचे ‘ऑप्शन’ भरून घेण्यात येत आहेत असे धोडमिसे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५० सदस्य आणि पंचायत समित्यांचे १०० सदस्य असून या निवडणुकीत ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असून ती ३ लाख १९०३ इतकी आहे तर पुरुष मतदार २ लाख ९७ हजार ६६० इतके आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रतिबंधात्मक कारवाई
सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा राज्याच्या सीमेवर येतो.त्यामुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना चाप बसावायासाठीदोडामार्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये १० ठिकाणी ‘तपासणी नाके ‘ तयार करण्यात आले आहेत.तसेच जिल्हाभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात एकूण ८७० मतदान केंद्रे असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १५३ तर सावंतवाडी तालुक्यात १४३ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी सुमारे ४,५०० कर्मचारी लागणार आहेत.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात असलेल्या ६५ मतदान केंद्रांमध्ये नेटवर्कची सुविधा नसल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.
