कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा
बिर्ला महाविद्यालयात वस्त्रे, विणकाम आणि हस्तकलांचे प्रदर्शन
कल्याण : बांधणीचे, यंत्रमागावरील कापड, रेशीम, ताग, सुती अशा विविध प्रकारचे कापड, त्यावर केली जाणारी छपाई, त्याची कला, त्यापासून बनवली जाणारी वेगवेगळी कापडांचे प्रकार आणि त्यामागचा इतिहास तसेच परंपरा पाहण्याची संधी नुकतीच कल्याणकरांना मिळाली. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे विणलेल्या परंपरा (वूवन लेगसीज) या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी कापडाचा प्रवास उलगडून सांगितला.
कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयातील इतिहास विभागाने शनिवारी विणलेल्या परंपरा: भारतातील उत्कृष्ट वस्त्रे, विणकाम आणि हस्तकला हे प्रदर्शन आयोजित केले होते. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनात देशाची वस्त्र परंपरा उलगडून सांगितली. प्रदर्शनाची संकल्पना तृतीय वर्षाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या ‘भारतीय कलेचा इतिहास’, ‘जागतिक कलेचा इतिहास’ आणि ‘वारसा पर्यटनाची ओळख ‘ या विषयांवर आधारित होती. या प्रदर्शनाचा उद्देश सिंधू संस्कृतीपासून ते आजपर्यंतच्या भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणे हा होता. या प्रदर्शनासाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे फॅशन डिझाइन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन हडप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. हडप यांनी ‘वस्त्रांपासून फॅशनपर्यंत: भारतावरील एक ऐतिहासिक दृष्टिकोन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा जाधव, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रणिता हरड यांनी यात मोलाची भूमिका बजावली. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अन्य महाविद्यालये आणि शाळांनाही आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थितांनी भारतीय वस्त्रपरंपरेच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेतला.
या प्रदर्शनात देशातील साड्यांचे प्रकार, पैठणी, इरकल, कापडांचे प्रकार, बांधणीचे कापड, मॅँचेस्टरवरून आलेला आणि यंत्रमागावर बनलेला मांजरपाट कापड, मेंढराऱ्या केसांपासून तयार होणारी घोंगडी, तागाचे गोणपाट, रेशीम कापड मांडण्यात आले होते. तसेच या विविध प्रकारच्या कापडापासून बनलेल्या इतर वस्तुही होत्या. सुती, बांधणी, साधे कापड, त्यांची माहिती, त्यावर विविध रंगांची हाताने केली जाणारी छपाई, इम्ब्रोडरी, तसेच कापडासोबत केली जाणारी कलाकारी उपस्थितांना पाहता आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रेक्षकांची संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *