जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध
जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आदेश
अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग :जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरील पक्ष प्रचाराचे झेंडे व कापडी फलक याबाबत जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. आदेशानुसार, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो वाहनाच्या छतापासून २ फुटांपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक हे वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावयचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलकसंबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश आचारसंहितेच्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. हा आदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकावर जाहीर करून त्याची व्यापक प्रसिद्धी देण्याचेही आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
