ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन!
संदीप माळवी, रवींद्र प्रभुदेसाई, व चंद्रशेखर पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती !
यंदाच्या वर्षातील पहिल्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेला खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या सर्व भागातून १७ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील ४०० खेळाडूंचा सहभाग आहे.
या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ठाणे महापालिकेचे क्रीडा प्रेमी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तसेच पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन रवींद्र प्रभुदेसाई आणि नामवंत गुंतवणूक सल्लागार चंद्रशेखर पुरोहित तसेच सर्व खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. संदीप माळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच रवींद्र प्रभुदेसाई यांनी नारळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले. पुरोहित यांनी बॅडमिंटन कोर्टाचे हार घालून पूजन केले.
संदीप माळवी यांनी आपल्या भाषणात ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीची व त्याचे प्रमुख श्रीकांत वाड व सर्व प्रशिक्षक घेत असलेल्या अहोरात्र मेहेनतीबद्दल त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच रवींद्र प्रभुदेसाई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. व गरजू आणि गुणवंत खेळाडूंन साठी ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन करीत असलेल्या विशेष मदतीचा खास उल्लेख केला. तसेच पितांबरी लिमिटेड तर्फे आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. पुरोहित यांनी देखील ठाण्याच्या बॅडमिंटन पटूंच्या खास कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले. या प्रसंगी राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील १४ वर्षीय वयोगटातील सुवर्ण पदक विजेता मयंक राजपूत चा खास सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत, राजीव गणपुले, तारक मोदी, सतीश शबराय, मितेश हजारनीस, संदीप कांबळे तसेच प्राजक्ता रानडे कांबळे हे ही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांनी केले.
