ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल!
ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ३९ पैकी २८ जागा पटकावुन एकीकडे ७५ टक्के इतका स्ट्राईक रेट राखला असताना दुसरीकडे या २८ विजेत्यांमधील नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी यांनी ७१.५६ टक्के मते घेऊन त्या भाजपमध्ये अव्वल विजेत्या ठरल्या आहेत. मतदार राजाने प्रतिभा मढवी ह्यांना विक्रमी मतदान करून डॉ.राजेश मढवी फौंडेशनच्या माध्यमातून नौपाडा प्रभागात गेली अनेक वर्ष केलेल्या समाजकारणाची पावतीच एक प्रकारे दिल्याचे दिसुन येत आहे.
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीमध्ये असलेल्या भाजपने २८ जागांवर निर्विवाद विजय मिळवुन घवघवीत यश संपादीत केले. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या, त्यामध्ये ५ जागांची भर पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनसेवक आमदार संजय केळकर, ठाणे निवडणुक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन शक्तीच्या जोरावर ओवळा ते शिळ अशा प्रत्येक विधानसभेत भाजपने कमळ फुलवले आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या ह्या २८ नगरसेवकांपैकी नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मधील भाजप उमेदवार प्रतिभा मढवी यांनी, विजयाची पुनरावृत्ती करताना प्रभाग २१ मधून झालेल्या २५ हजार ७७ इतक्या मतदानापैकी तब्बल १७ हजार ९४५ असे ७१.५६ टक्के विक्रमी मतदान मिळवले आहे. प्रतिभा मढवी ह्या भाजपचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या पत्नी असुन गेली अनेक वर्षे हे दांपत्य पक्षभेद विसरून प्रभागातील नागरिकांची अविरत सेवा करीत आहे. एक प्रकारे मढवी दांपत्याच्या समाजकार्याची पोचपावती मतदारांनी दिल्याचे दिसुन आले आहे.
चौकट
महायुतीचे वीर दौडले ‘सात’
भाजप – शिवसेना महायुतीने ठाण्यात लढवलेल्या एकुण १३१ जागांमध्ये युतीचे तब्बल सात ‘वीर’ तुफान दौडले आहेत. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास या १३१ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक पसंतीचे हक्कदार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १७ ड चे योगेश जानकर ठरले असुन त्यांना ७६.४६ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल प्रभाग १६ अ मधील सेनेच्याच डॉ. दर्शना जानकर यांना ७२.३३ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल भाजपच्या प्रतिभा मढवी यांना ७१.५६ टक्के, संजय वाघुलेंना ७०.७३, सेनेच्या मंदार केणीना ७०.७१, संध्या मोरे ७०.६१ आणि जयश्री डेव्हीड यांना ७०.५९ टक्के इतके मतदान झाल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *