प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ?
नगरसेविका तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे भाजपाने लावले बॅनर
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शिवसेनेचे ५३, भाजपा ५०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११, मनसेचे ५, कॉंग्रेसचे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्र. ४ मध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले असून या विजयामागे भाजपाचा हात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्याला कारण हि तसे असून ठाकरे गटातून निवडून आलेल्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच मोहने परिसरात तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले असून या बॅनरवर माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचा फोटो असल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत.
केडीएमसीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये लागलेल्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागात शिवसेनेचे दिग्गज मानले जाणारे माजी नगरसेवक मयूर पाटील त्यांच्या पत्नी नमिता पाटील, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहन कोट आणि शिवसेना विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या पत्नी पूजा जोगदंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी नमिता पाटील या अवघ्या ८ मतांनी तर रोहन कोट हे १७०३ मतांनी निवडून आले. मात्र शिवसेनेच्या मयूर पाटील आणि पूजा जोगदंड यांचा ठाकरे गटाच्या राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी पराभव केला आहे. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असतानाच, मोहने परिसरात लावलेल्या तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचे फोटो आहेत. तर तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली होती. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाला एकही जागा न दिल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
