अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानांतर्गत
प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट
ठाणे : अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी १६ जानेवारी रोजी आयुक्त डॉ. कादंबरी बालकवडे यांनी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पडघा येथे भेट दिली. या दौऱ्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीची सखोल पाहणी करण्यात आली. या वेळी उपसंचालक डॉ. नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दौऱ्याच्या सुरुवातीस आयुक्त डॉ. कादंबरी बालकवडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर पाहणी केली. यावेळी E-Sushrut, E-Aushadhi, E-Vin यांसारख्या डिजिटल पोर्टल्सचा प्रत्यक्ष वापर होत आहे की नाही, याची त्यांनी खातरजमा केली. तसेच प्रयोगशाळेमधील विविध तपासण्या, कामाचे प्रमाण आणि संबंधित नोंदी तपासून आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बालकवडे व डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉ. नितीन अंबाडेकर यांनी अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा अंतर्गत उपकेंद्र स्तरावर राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपकेंद्र पातळीवर दिल्या जाणाऱ्या १३ आरोग्य सेवांची गुणवत्ता व कार्यक्षमता तपासण्यात आली.
यावेळी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉ. नितीन अंबाडेकर यांनी नागरिकांना अधिक प्रभावी, वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कार्यपद्धतींबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सेवा देताना येणाऱ्या अडचणी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. यासह विविध प्रशासकीय बाबींवर सविस्तर सूचना देण्यात आल्या.
या दौऱ्यादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती, भिवंडी) डॉ. नलिनी यशवंत ठोंबरे, प्राथमिक आरोग्य केंद्र पडघाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञेश पाटील, डॉ. निखील जोगळेकर, डॉ. साक्षी बुलबुले तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. दौऱ्याच्या अनुषंगाने योग्य नियोजन करून माहितीचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाच्या माध्यमातून सिकलसेल आजाराचे लवकर निदान, प्रभावी उपचार व जनजागृती यावर भर देण्यात येत असून, अशा प्रत्यक्ष भेटी व आढावा दौऱ्यांमुळे अभियान अधिक सक्षमपणे राबविण्यास बळ मिळत असल्याचे प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले.
