मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर
भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा केला पराभव
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक नुकतिच पार पडली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा देखील सहभाग आहे. मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कल्याण मधील प्रभाग क्र. ७ ड मधून भाजपाच्या वतीने डॉ. पंकज उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्ष आदेशानुसार उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांना भाजपा पुरस्कृत उमेदार म्हणून जाहीर केले. मात्र कोविड काळानंतर प्रभागात न फिरकल्याने मतदारांनी त्यांना नाकारत मनसेच्या गणेश लांडगे यांना पसंती दिल्याची चर्चा आहे.
तर मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे हे गेली १० वर्षे प्रभागासः कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सक्रीयपणे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असो कि शहरातील नागरिकांच्या संदर्भात एखादा विषय, या दोघांच्या जोडीने अनेक विषय लावून धरत नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे मनसे पक्षातर्फे प्रभाग क्र.७ ड मध्ये गणेश लांडगे यांना आणि कपिल पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांना प्रभाग क्र. ९ ब मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र सोनल पवार यांचा यात पराभव झाला असून गणेश लांडगे यांनी भाजपाच्या संदीप गायकर यांचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत. या निकालानंतर आता कपिल पवार यांच्याकडे शहराची जवाबदारी देण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांमधून होत आहे.
