मिरा-भाईंदरमध्ये फेब्रुवारीत मेट्रो धावणार – प्रताप सरनाईक
मिराभाईंदर, शहराच्या वाहतूक कोंडीपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंतच्या २५ विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चेना रिव्हर वॉटर फ्रंट रस्ता, शिवसृष्टी मार्ग, खाडी किनारा विकास, नवीन पालिका इमारत, ५१ फुटी विठ्ठल मूर्ती (जरीमरी तलाव), क्लस्टर योजना, आरोग्य सेवा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोबतच मेट्रो-९ चा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून मेट्रो संदर्भात आता मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.मिरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या ५० कोटी निधीमार्फत महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शहरात भव्य ‘उमेद’ मॉल उभारण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत. सोबतच मिरा-भाईंदर शहरात महिलांसाठी हॉस्टेल उभे राहावे याकरिता ५० कोटींचा निधी राज्य शासनाकडून मजूर करून लवकरच त्यासाठी जागा निध्चीत केली जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आधीच मिरा-भाईंदर शहराच्या विकास कामांकरिता १४०० कोटी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९०० कोटी एकूण २३०० कोटींचा निधी मंजूर झाला असताना, आता रस्ते काँक्रिटीकरणासाठी अतिरिक्त १२०० कोटींचा निधी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे आणि लवकरच याची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. या १२०० कोटी रुपये निधीच्या माध्यमातून शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटिकरण करण्यासाठी चालना देण्यात येणार असून येत्या दीड ते दोन वर्षात संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.बीओटी (BOT) (Build-Operate-Transfer) तत्त्वावर संपूर्ण मिरा-भाईंदर शहर मोफत वाय-फाय सुविधेने सज्ज होणार आहे. यासाठी येत्या २-३ महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.याप्रसंगी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले कि, “मिरा-भाईंदरचा लोकप्रतिनिधी म्हणून शहराला अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज करणे हे माझे कर्तव्य आहे. विकासाच्या या प्रवासात कोणतीही अडचण येऊ देणार नाही आणि ‘स्वप्नातील मिरा-भाईंदर’ सत्यात उतरवेन. निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्यासाठी आता दर महिन्याला शहरात ‘जनता दरबार’ घेणार आहोत. नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या जागेवरच निकाली काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच, पालिका प्रशासनाच्या कामात गती आणण्यासाठी दर महिन्याला आयुक्त स्तरावर आढावा बैठक देखील घेतली जाईल. मिरा-भाईंदर शहराचा विकास कोणत्याही कारणाने थांबणार नाही हि जबाबदारी माझी आहे आणि ती मी पूर्ण करणार हा माझा शब्द आहे.”
