मुंबई : मुंबईत मराठी भवन उभारण्याचा अजून पत्ता नसताना दुसरीकडे बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ३० मजली ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील बिहारवासीयांसाठी एक मोठे आधारकेंद्र ठरणार आहे.
प्रस्तावित बिहार भवन ३० मजली असणार असून, बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे ६९ मीटर इतकी असणार आहे. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच मुंबईतील हे भवन देखील सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग, तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार आहे. हा भव्य प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे उभारला जाणार असून, यासाठी सुमारे ०.६८ एकर म्हणजेच २७५१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या इमारतीसाठी सुमारे ३१४.२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, रोजगार, व्यवसाय, उपचार आणि विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर बिहारमधील नागरिक येथे येत असतात. त्यामुळे या बिहार भवनामुळे बिहारमधील प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांना निवास, मार्गदर्शन आणि शासकीय सहकार्य मिळण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला असून, सध्या परिसराची सीमा भिंत पूर्ण करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
