मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी
अनिल ठाणेकर
ठाणे : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व गावपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने सेलिब्रिटी भेटींचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री शिवाली परब व अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांना भेटी दिल्या. यानुसार १८ जानेवारी रोजी भिवंडी तालुक्यातील डोहळे, शहापूर तालुक्यातील भावसे–खोस्ते तसेच मुरबाड तालुक्यातील खेवारे येथे हे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना अभिनेत्री शिवाली परब म्हणाल्या की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असून प्रत्येक ग्रामस्थाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहभागी होऊन गावाने बक्षिसे मिळवावीत, असे आवाहन त्यांनी केले. अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गाव समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास आमदार दौलत भिका दरोडा, जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष (आप्पा) घरत, उल्हासभाऊ बांगर, माजी सभापती पंचायत समिती अनिल घरत, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंडित राठोड, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, बी. एच. राठोड, लता गायकवाड, राज्य समन्वयक यास्मिन शेख यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, सरपंच व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डोहळे येथील जिल्हा परिषद शाळेत विकसित परसबाग व आवारातील बागेची पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे गृहप्रवेश, रुग्णवाहिकेचे उद्घाटन, महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन तसेच सुरू असलेल्या विकासकामांची चित्रफीत सादर करण्यात आली. महिला बचत गटांमार्फत सेंद्रीय कडधान्य, सन्मानचिन्ह व वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक आदिवासी गौत्या नृत्याचे सादरीकरण झाले. डिजिटल शाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलतारा, शोषखड्डा, वृक्षारोपण, सिंचन विहीर व मोगरा लागवड प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.
खेवारे येथील केंद्रशाळेत डिजिटल शाळेचे उद्घाटन, शोभायात्रा, महिला प्रेरणा संघाच्या सामूहिक परसबाग प्रकल्पास भेट, डास निर्मूलन व अनिष्ट रूढी निर्मूलन फलकाचे उद्घाटन करण्यात आले. कुलस्वामिनी मंदिरात श्रमदानातून जलतारा व वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, घरकुल प्रवेश व ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.
