शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत
अनिल ठाणेकर
सांगली, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व नेतृत्वगुणांचा पाया राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घातला जातो. शिबिर हे अनुभवाने जगता येते, असे प्रतिपादन जिल्हा समन्वयक डॉ. गोरखनाथ किर्दत यांनी केले. मसुचीवाडी येथे मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “समायोजन,आपले वर्तन ,सहकार्य, समर्पणाची भावना हीच, स्वयंसेवकाची खरी ओळख आहे. समाजाची गरज काय आहे हे जाणून घेऊन समाजाच्या मदतीसाठी जाऊन आपल्याला योगदान देता येईल व सामाजिक बांधिलकी जपता येईल.” अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर होते. ते म्हणाले की, ग्रामीण संस्कृतीची जाण आणि समाजशीलता शिबिरातून निर्माण होते. कृतीद्वारे घेतलेले शिक्षण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उपयोगी पडते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे वेगवेगळी कौशल्य असणे गरजेचे आहे. सरपंच राधिका पाटोळे, उपसरपंच अमित कदम, ग्रामपंचायत सदस्य उज्वला फाटक, जयेश कदम, अजित गुरव ,तुकाराम सावळा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळगे ,सर्व प्राध्यापक, कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात गावची स्वच्छता, नदी परिसर स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन ,जलसाक्षरता, कृषीविषयक सर्व्हे ,आरोग्य तपासणी सर्वे ,शाळेच्या परिसरात परसबाग, प्रबोधनपर व्याख्याने, व्यसनाधीनतेवर पोस्टर प्रेसेंटेशन इत्यादी उपक्रम राबविले .शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.
