कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील खड्ड्यांविषयी ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी दिले आश्वासन
अशोक गायकवाड
कर्जत: कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील कर्जत तालुक्यातील कशेळे येथील मुख्य रस्त्यावर मागील गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ मोठे खड्डे पडले असल्यामुळे स्थानिकांसह प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषता पंचक्रोशीतील नागरिकांचे मुख्य बाजाराचे ठिकाण असलेल्या कशेळे बाजारातील रस्ता हा अत्यंत दयनीय अवस्थेत पाहायला मिळतो आहे. येथील रस्ता पूर्णपणे उखाडला असल्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. यासंदर्भात सोमवार दिनांक १९ जानेवारी रोजी कशेळे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, राजेंद्र हरपूडे, सचिन राणे, पत्रकार दिनेश हरपूडे, विजय शिंदे यांनी नरिमन पॉईंट येथील एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेऊन या रस्त्यावरील खड्डे भरण्या संदर्भात चर्चा करून त्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत संवाद साधत खड्डे भरण्याबाबत विनंती केली. यावेळी गायकवाड यांनी या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात येईल असे सांगून संबंधित अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी सदर रस्त्यावरील सर्व खड्डे हे पंधरा दिवसात बुजवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील कशेळे येथील खड्डे भरतील कि, नुसतीच आश्वासन याकडे स्थानिकांसह प्रवासी वर्गाचे लक्ष लागले आहेत. तर कर्जतमधील कशेळे नाका आणि पेज नदी पुलावरील पडलेले खड्डे तसेच वंजारवाडी या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः झालेली चाळण व यामुळे मागील काळात या ठिकाणी अनेक अपघात झाले असून काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात कर्जत तालुक्यातील स्थानिकांसह, सामाजिक कार्यकर्ते आणी पत्रकार बांधव यांनी सुद्धा अनेक वेळा वारंवार आवाज उठवला आहे. परंतु, या रस्त्यावर आजपर्यंत थोडीफार डागडुजी करून ठेकेदारांनी अनेक वेळा हात झटकले आहेत. तरी सुद्धा संबंधित विभागाचे या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष असल्यामुळेच आज या परीस्थितीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कशेळे गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापारी संघटना यांनी गणेशोत्सव काळात स्वखर्चाने याच राज्य मार्गावरील कशेळे गाव ते वंजारवाडी पर्यंतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे भरल्याने वाहन चालकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु, पावसाळ्यानंतर या रस्त्यावर खड्यांचे प्रमाण वाढले असल्याने धुळीने श्वसनाचे त्रास स्थानिकांना व येथील छोट्या व्यवसायिकांना जाणवू लागले आहेत. तर, सरकारी रुग्णालय परिसरातील खड्डूयामुळे गरोदर महिलांना त्रास होत आहे. याबाबत कशेळे ग्रामस्थांनी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी याकरिता संबंधित अधिकारी यांना उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, या बाबतही आजपर्यंत सर्वच अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले आहे.
