गोवेली येथे २३ जानेवारीला मराठी भाषेच्या ‘बोलींचा जागर’
कल्याण: मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली, समृद्ध आणि सशक्त भाषा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोली या मराठी भाषेचे वैभव असून त्या त्या प्रदेशाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख जपतात. या बोलींचे जतन, संवर्धन व अभ्यास घडावा, या उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘बोलींचा जागर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ जानेवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत गोवेली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषेतील विविध बोली या भाषेची ताकद असून त्या लोकजीवन, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवतात. या बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासन मराठी विभाग , भाषा संचालनालय, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार असून त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल. मुख्य कार्यक्रमात बोलींचा जागर, प्रातिनिधिक वारली व कुपारी या स्थानिक बोलींतील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण, संवाद तसेच बोलीभाषा अभ्यासकांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. नेहा सावंत आणि डॉ. रुपेश कोडिलकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र घोडविंदे राहणार आहेत. या उपक्रमाचे निमंत्रण मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, तसेच महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय भाषा संचालक अरुण गिते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून मराठी विभाग प्रमुख प्रा. हरेंद्र सोष्टे आणि प्रा. सतीश लकडे हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी भाषेच्या विविध बोलींचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या या ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
