अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमेरिकेने तेलासाठ्यासाठी व्हेनेझुएला या छोट्याशा देशावर अरेरावी करून त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांना अटक केली आणि स्वतःला व्हेनेझुएला या देशाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर त्यांनी इराणमधील आंदोलनांना हवा देऊन तो देश अस्थिर करण्याचा डाव आखला इतकेच नाही तर इराणवर अमेरिका मोठा हल्ला करेल आणि इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांना पदच्युत करण्याची धमकी देऊन त्या देशावर अरेरावी केली. अमेरिकेच्या या अरेरावीचा संपूर्ण जग निषेध करत असतानाच ट्रम्प यांची नजर अमेरिकेचा शेजारी असलेला ग्रीनलँड या छोट्या देशावर पडली आणि हा देश देखील आपल्या घशात घालण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आणि ग्रीनलँड हा अमेरिकेचाच एक भाग असून लवकरच ग्रीनलँड हे अमेरिकेतील नवे राज्य असेल अशी घोषणा केली. ग्रीनलँडने स्वतःहून अमेरिकेत विलीन व्हावे आणि जर ग्रीनलँड स्वतःहून अमेरिकेत विलीन झाला नाही तर अमेरिका लष्करी बळ वापरून त्या देशाला अमेरिकेत विलीन करेल अशी धमकी दिली. इतकेच नाही तर जे देश ग्रीनलँडचे समर्थन करतील त्या देशांवर अमेरिका जबर आयात शुल्क अर्थात टेरिफ लावेल असा सज्जड दम देऊन त्यांना ब्लॅकमेल केले. ग्रीनलँडला समर्थन देणाऱ्या युरोपीय देशांना केलेले हे ब्लॅकमेलच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ब्लॅकमेली विरुद्ध युरोपात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या या अरेरावी विरुद्ध डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन आणि इतर शहरात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि ग्रीनलँड हा विकाऊ देश नाही अशा घोषणा दिल्या. इंग्लंड, फ्रान्स या देशांनी देखील ट्रम्प यांच्या या धोरणावर टीका केली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अरेरावी थांबवावी असे निवेदन दिले आहे. केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जग अमेरिकेच्या अरेरावी विरुद्ध एकजूट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका खंडातही खदखद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणाविरुद्ध दक्षिण अमेरिका खंडातील देशातीलही मोठी नाराजी आहे. आज या देशांनी जाहीरपणे तसे बोलून दाखवले नसले तरी ते ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. अमेरिकेतील नागरिकांनाही ट्रम्प यांचे हे विस्तारवादी धोरण मान्य नाही पण ट्रम्प आपली हेकेखोरी सोडायला तयार नाही. काहीही करून आपल्या शेजारी असलेल्या लहान देशांना अमेरिकेत विलीन करून घ्यायचे, तेल संपन्न राष्ट्रांवर ताबा मिळवून तेथील तेलासाठे ताब्यात घ्यायचे तसेच जे आपले ऐकणार नाही त्यांच्यावर जबर आयात शुल्क अर्थात टेरीफ लावून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि संपूर्ण जगावर आपली एकहाती हुकूमत गाजवायची हे ट्रम्प यांचे धोरण आहे आणि ट्रम्प यांचे हेच विस्तारवादी धोरण जगाला युद्धाच्या खाईत घेऊन जाईल हे मात्र नक्की.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295
श्याम ठाणेदार
