भाजपात आजापासून नबीन पर्व !

नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड 

नबीन ठरले भाजपाचे सर्वात तरुण अध्यक्ष

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीत आजपासून नबीन पर्व सुरु झाले आहे. भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, जे.पी.नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज आल्याचं सांगत त्यांनी नबीन यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचं प्रमाणपत्र सोपवले.

नितीन नबीन हे मूळ कार्यकर्ते आहे. अगदी लहान वयात ते ५ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेत. बिहार सरकारमध्ये अनेकदा ते मंत्री होते. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभरात काम केले. सिक्कीम, छत्तीसगड येथे प्रभारी म्हणून काम केले. संघटनेतील अनुभवासोबत त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी पुढे जाईल असा विश्वासमावळते अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटनिंग ऑफिसर म्हणून के. लक्ष्मण यांच्याकडे नितीन नबीन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. एकूण नामांकनाचे ३७ संच सादर करण्यात आले ते सर्व अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २ ते ४ या वेळेत पूर्ण झाली. नामांकन अर्जाच्या ३७ संचांपैकी ३६ संच विविध राज्यातून आले. उरलेला एक संच भाजपा संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला. त्यात पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर केवळ एकमेव अर्ज नितीन नबीन यांचा राहिला.

आतापर्यंतचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी हे वयाच्या ५५ व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते. तेव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. त्यानंतर १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा अडवाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

१९९१ ते ११९३ या काळात वयाच्या ५७ व्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. १९९८ ते २००० या काळात कुशाभाऊ ठाकरे, २०००-२००१  बंगारू लक्ष्मण, २००१-२००२ जना कृष्णमूर्ती, २००२-२००४ या काळात व्यंकय्या नायडू, २००५ ते २००९ आणि २०१३-२०१४ या काळात राजनाथ सिंह, २००९ ते २०१३ मध्ये नितीन गडकरी, २०१४ ते २०२० वयाच्या ४९ व्या वर्षी अमित शाह यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.

नबीन माझे बाॅस…

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षम्हणून निवडूण आल्यानंतर नबीन यांनी पदभार स्वीकारला.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्यांच्या आसनापर्यंत नेले आणि आपल्या भाषणात नबीन यांना माझे बॉस असा उल्लेख करीत त्यांचा सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *