जि. प. व पं. स. निवडणूक
वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी
जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश
अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी वापरणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहने वापरण्यास बंदी घालणारे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहनांचा ताफा वापरण्यास मनाई केली आहे. हे आदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वतंत्रपणे पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशांची जाहीर घोषणा व प्रसिध्दी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
