शहापूर वनविभागाचे सरकारी फलक भंगारात
धक्कादायक वास्तव उजेडात
अविनाश उबाळे
ठाणे : शहापूर तालुक्यातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासनाकडून जनजागृतीपर बसविण्यात येणारे सरकारी फलक चक्कं आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून आहेत.अगदी निष्काळजीपणे हे फलक येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.
वनसंपत्तीचे नुकसान होऊ नये,यासाठी वनविभागाची सरकारी नियमावली त्यांचे कडक कायदे,याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे सुचना फलक शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाच्या शहापूर, धसई,डोळखांब, वाशाळा, विहीगाव, खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात लावण्यात येणारे होते. परंतु हे सुचना फलक जंगलात लावण्यातच न आल्याने यातील बहुतांश फलक वनविभागाच्या आसनगाव काष्ट विक्री आगारातील आवारात अक्षरशः भंगारात अस्तव्यस्त, अवस्थेत अडगळीत, धुळखात, कचऱ्यात पडून आहेत. या सरकारी फलकांवर वनक्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणे,वन हद्दीतील खुणा व बुरुज नष्ट करणे, झाडांना इजा पोहचविणे व त्यांची तोड करणे, अतिक्रमण करणे, खोदकाम करणे, दगड,माती, वाळू काढणे व वाहतूक करणे, वणवे पेटविणे, वनास आग लावणे,धूम्रपान करणे,मद्यपान करणे,आदी कृत्य आढळून आल्यास सदर व्यक्ती भारतीय वन अधिनियमानुसार नुकसान भरपाई व्यतीरिक्त कारावास,तसेच द्रव्य दंडास पात्र असेल हा गुन्हा अजामीन पात्र आहे.गुन्हयात वापरलेली हत्यारे,अवजारे व वाहने,शासन जमा करण्यात येतील असं हुकुमावरून उपवनसंरक्षक शहापूर वनविभाग असा वनविभागाच्या या शासकीय कठोर नियमावली बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संदेशपर माहीती या सरकारी फलकांवर लिहिण्यात आलेली आहे.असे हे वनखात्याचे फलक वनविभागाकडून जंगलात लावण्यासाठी संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना पुरवठा करण्यात येणार होते.तथापि हे सरकारी फलक वेळेवर काही वनपरिक्षेत्र कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून नेण्यात आले नाहीत.परिणामी यातील बरेच फलक जंगलात बसविण्यात न आल्याने हे फलक आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे.वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळीजपणामुळे हे सरकारी फलक भंगार जमा झाल्याचे चित्र काष्ट विक्री आगारात दिसत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अभिजीत पिंगळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
