ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’!

मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेला पाठींबा

ठाकरेंचे ४ नगरसेवकही फुटले

शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार

स्वाती घोसाळकर

कल्याण : तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करून कल्याण डोंबिवलीत ५ नगरसेवक निवडूण आणणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत पाठींबा दिला आहे. मनसेच्या या भुमिकेमुळे एकुणच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे चार नगरसेवकही फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा दिला असल्याचे वृत्त आहे. शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हे ऑपरेशन टायगर यशस्वीपण राबववित केवळ कल्याण डोंबिवलीतच नव्हे तर उल्हासनगरमध्येही शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर निश्चित केला आहे.

 भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे स्वत: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे  यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर ६२ हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे ५३ नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे ५० नगरसेवक आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचे ११ आणि मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक नॉट रिचेबल झाले होते. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती. अशातच ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जाताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर होते. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ ११ वरुन ७ वर आले आहे.

ठाकरे गटाचे जे दोन नगरसेवक मनसेत गेले होते, ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही मनसेत गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे. आता हे दोन आणि मनसेचे निवडून आलेले ५ नगरसेवका अशा ७ नगरसेवकांनी सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. स्वत: खासदार श्रीकांत यांनी याबाबत माहिती दिली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ५३ नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. विकासाच्या मुद्द्यावरून मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली. ठाकरेंचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, याबाबत माहिती नाही, ते कुठेतरी फिरायला गेले असतील. ठाकरेंच्या उर्वरित नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिल्यास हरकत नाही. आम्ही जो विकास करतोय ते पाहून कोणीही पाठिंबा देत असेल तर काय हरकत आहे, असेही श्रीकांत शिंदेंनी म्हटले.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या गट नोंदणीवेळी कोकण भवन येथे शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक अनुपस्थित होते. या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा निकाल –

एकुण जाग – 122

शिंदे शिवसेना : ५३
भाजप : ५०
उबाठा : ११
मनसे : ५
काँग्रेस : २
राष्ट्रवादी (शप):  १

photo catption

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना पक्षाच्या गट स्थापनेसाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र देताना शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे. सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *