मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगर पालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता.
गटनेतेपदासाठी महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला २९, काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १, समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
