बदलापूर : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. बदलापूर पश्चिमेला असणाऱ्या नामांकित खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे बदलापूरमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे मुलीचे पालक सुरुवातीला शाळेत गेले तेव्हा मुख्याधापिकेने बस चालकाची बाजू घेतली. यापूर्वीही बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रकार यावेळीही घडला. शाळेच्या मुख्याधापिकेने दाद न दिल्यामुळे पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चालकाला अटक केली.
प्राथमिक माहितीनुसार, ज्या लहान मुलीसोबत चालकाने दृष्कृत्य केले ती नर्सरीत शिकत होती. मुलीचे पालक तिला घेऊन शाळेत गेले त्यावेळी मुख्याधापिकेने बस ड्रायव्हरला शाळेत बोलावून घेतले. बस चालक शाळेत आल्यानंतर मुख्याधापिकांच्या केबिनमध्ये शिरला तेव्हा तिथे असलेली चार वर्षांची चिमुरडी घाबरली. ती आपल्या पालकांच्या पाठीमागे लपली. यावरुन पालकांना मुलीच्या मनस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात राज्य सरकारने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे आता बस चालकासह शाळेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
PHOTO CAPTION
याच स्कुलबसमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाला. पोलिसांनी ही स्कुलबस जप्त केले.
