मुंबई : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपानंतर शिवसेना (शिंदेगट) हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय, “चांदा ते बांदा शिवसेना घराघरात पोहोचली आहे. शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे आपण पुन्हा एकदा सिद्ध झाले, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुर्ण केली म्हणूनच आपण भाजपासोबत आहोत असे ठासून सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिंदे यांनी महापालिका निवडणुकांतील यश, शिवसेनेची भूमिका आणि बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी अभियानांची माहिती दिली.
बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने आठवताना शिंदे म्हणाले,अयोध्येत राम मंदिर उभारले जावे आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवावे, ही बाळासाहेबांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दोन्ही स्वप्ने पूर्ण केली. एनडीएमध्ये शिवसेनेला कायम सन्मानाची वागणूक मिळाल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. बाळासाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते होते. त्यांच्याच विचारांतून ‘आरोग्य आपल्या दारी’सारखी अभियानं राबवत आहोत, त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राज्यभर विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ‘बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ अंतर्गत २९ महापालिका आणि ३९४ नगरपालिकांमध्ये विविध योजना राबवण्यात येणार असून, महापालिकांना प्रत्येकी ३ कोटी तर नगरपालिकांना १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
महिला बचत गट सक्षमीकरणासाठी नगरविकास विभागामार्फत १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मराठी भाषेसाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून ‘प्लास्टिकमुक्त गड-किल्ले’ अभियान सुरू करण्यात येणार असून, गडकोट स्वच्छता मोहीमही राबवली जाईल. शिवभक्तांच्या स्वयंसेवी संस्थांना एक लाख रुपयांचे मानधन देण्याची घोषणा करण्यात आली.तसेच कॅशलेस उपचारांची व्याप्ती वाढवण्यात येणार असून, पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. पालिका क्षेत्रातील उत्कृष्ट शाळांना अनुक्रमे १० लाख, ७ लाख आणि ३ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
