कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम
कल्याण : कल्याण पूर्व येथील कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्येची देवी माँ सरस्वतीची पूजा-अर्चा श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. मिथिलाजन एज्युकेशनल सोशल अँड रिलिजियस ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कल्याणी दुर्गा माता मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन, सरस्वती पूजन, हवन तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
वसंत पंचमीच्या खास प्रसंगी मिथिलाजन ट्रस्टच्या माध्यमातून ज्ञानाची देवी माँ सरस्वतीची पूजा करण्यात आली तसेच शेकडो गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेची फी भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करण्यात आली. या उपक्रमाबाबत मिथिलाजन ट्रस्टचे अध्यक्ष संजीव मिश्रा यांनी सांगितले की, मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने दरवर्षी ट्रस्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी, सुमित झा, दीपक मिश्रा, केशरी पांडेय, आनंद झा आदींचे मोलाचे योगदान लाभले.
