धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा
दुर्गंधीने उद्यानातील बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक त्रस्त
कल्याण : २७ जानेवारी या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती असते. या दिवशी शिवसैनिक, त्यांचे नेते मंडळी व त्यांचावर प्रेम करणारे असंख्य नागरिक हे उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात. पण त्यांच्या नावाने असलेली उद्याने व इतर ठिकाणे यावर पाहिजे तितके लक्ष दिले जात नसल्याचे पाहण्यास मिळते.
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मॉडेल स्कुल जवळ असलेले धर्मवीर आनंद दिघे उद्यान २००२ साली तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उभारले होते. कालांतराने याचे दोनवेळा सुशोभीकरण हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या निधीतून करण्यात आले होते. परंतु केडीएमसी कडून याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने हे उद्यान नेहमी दुर्लक्षित राहिले आहे. आता तर या उद्यानात असणारा महापालिकेचा कंत्राटी सुरक्षारक्षक हा पण नसतो. त्यामुळे सकाळ/संध्याकाळी उघडे असणारे हे उद्यान फक्त सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेतच उघडे ठेवले जात आहे.
सुरक्षारक्षक नसल्याने झाडांना पाणी मारले जात नाही. तसेच प्रेमियुगल जोड्या या उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने प्रेमीचाळे करीत असतात. महापालिकेच्या निवडणूक पूर्वी येथील शिवसेनेचे  इच्छुक उमेदवार अभिषेक चौधरी यांनी या उद्यानाची साफसफाई व खेळणी दुरुस्त करून घेतली होती. परंतु त्याना नगरसेवक पदाचे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने आता त्याची देखभाल/दुरुस्ती पाहण्यासाठी दुसऱ्या कोणालाही सवड मिळत नसल्याचे दिसत आहे. गेले काही दिवस या उद्यानाला लागून असलेल्या पावसाळी गटारातून ड्रेनेज सांडपाणी जमा झाल्याचे दिसत असून त्यात डासांची अंडी,पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत असल्याने उद्यानात येणारे बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
येथील ही गटारे एमआयडीसी ठेकेदाराकडून बांधण्यात येत असून तीही अर्धवट स्थितीत आहेत. गटारे बांधतांना येथील सांडपाणी वाहिन्या या फुटल्याने त्यातील सांडपाणी हे पावसाळी गटारात जमा झाले आहे. याबद्दल एमआयडीसी व केडीएमसी यांना स्थानिक रहिवाशी शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख सागर पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, मंदार स्वर्गे यांनी कळवूनही यावर प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. २७ जानेवारी या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होते. कमीतकमी या जयंती पूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे लक्ष देतील का ? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *