नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात
चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांची माहिती
अनिल ठाणेकर
ठाणे : येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ठाण्यात होणाऱ्या संचलनात नागरी संरक्षण दलाचा (सिव्हिल डिफेन्स) एक प्लॅटून प्रथमच सहभागी होणार आहे. ठाणे विभागाचे चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक सहभाग घडत असून, अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली. यावेळी उपनियंत्रक विजय जाधव उपस्थित होते.
शत्रूच्या हल्ल्यांपासून तसेच नैसर्गिक आपत्तींच्या काळात नागरिक व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने १० जुलै १९६८ रोजी नागरी संरक्षण दलाची कायदेशीर स्थापना करण्यात आली. होमगार्डप्रमाणेच हे दल युद्धकाळात तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी संकटग्रस्त नागरिकांना मदत व पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून, सर्वसामान्य नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही देत आहे.
ठाणे विभागाचे चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरी संरक्षण दलाने गेल्या काही वर्षांत लक्षणीय कामगिरी केली आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दलाचा प्लॅटून प्रथमच सहभागी होत आहे. सध्या ठाण्यातील साकेत येथील पोलीस मैदानात नागरी संरक्षण दलाच्या प्लॅटूनचा नियमित सराव सुरू असून, आमदार संजय केळकर यांनी या सरावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जवानांच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
