‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन
पराक्रम दिनाला प्रचंड प्रतिसाद
मुंबई, दि. (प्रतिनिधी)
“स्वातंत्र्य मागून मिळत नाही… ते हिसकावून घ्यावे लागते!” या तेजस्वी विचारांचे मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी, भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला तो ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ या भव्य, भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व नृतनाट्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाच्या प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष! या राष्ट्रभक्तीने भारलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे (२१ पॅरा एस.एफ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ‘ऑक्सिजन लेडी’ सुमेधा ताई चिथडे यांच्या कार्यकथनाने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांमागची त्यांची निःस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचा तेजस्वी अध्याय ठरला.यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओंकार मुळ्ये, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर नारायण वाडकर, तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली.
या सन्मानसोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्य-संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावात “जय हिंद” गुंजत होते. याच मंचावर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कलमकर तसेच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू व सुवर्णपदक विजेते महादेव समजीस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवशाली पराक्रम दिन सोहळ्याला पितांबरी प्रॉडक्ट्स व इंडियन ऑइल यांचे मोलाचे प्रायोजन लाभले, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सुनील दळवी एमएफ इन्व्हेस्टमेंट्स, जाधव फूड्स, अद्वैता वास्तु, बीऑ.न स्टोअर, रुचिसूत्र यांनी सहप्रायोजक म्हणून भक्कम साथ दिली. ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प — देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली बलिदानाला आणि एक जागरण, प्रत्येक भारतीयाच्या मनातील पराक्रमाला!
