लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार
मुंबई : मुंबई येथे आयोजित ‘ग्लोऱ्या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात नामवंत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईस्थित स्वयंसेवी संस्था ‘परीशार आशा’ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लीना र. प्रभू गेल्या ३४ वर्षांहून अधिक काळ मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक म्हणून कार्यरत असून त्या विलेपार्ले येथील ‘पाथ टू प्रज्ञा’ या स्वतंत्र संस्थेच्या मॅनेजिंग पार्टनर आहेत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेले कार्य, व्यक्ती-केंद्रित समुपदेशन पद्धती तसेच संशोधनात्मक दृष्टिकोनामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून विकसित झालेल्या आणि संशोधनावर आधारित MES-Q या पद्धतीला २०१९ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता व सन्मान प्राप्त झाला होता. मानसिक आरोग्यविषयक संशोधन, प्रशिक्षण आणि समुपदेशनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील भरीव कार्य, संशोधनात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण सेवाभावी भूमिकेची दखल घेत लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
