दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर
के. सीता राममोहन राव, जयश्री पाटणेकर, कुमार सोहोनी, अजित भुरे, ईशा डे ठरले मानकरी
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण रविवार, १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. के. सीता राममोहन राव यांना संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार, जयश्री पाटणेकर यांना संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, कुमार सोहोनी यांना उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक, अजित भुरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी तर ईशा डे यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय डॉ. नीती बडवे यांच्या मुशाफिरी या पुस्तकासाठी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा तर तन्वी गोरे यांना संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांनाही कै. ताराबाई दीक्षित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०, ७७००९९४४९५.
