महामंडलेश्वर पद
ममताने त्यागले
मुंबई : सिनेस्टार ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पद त्यागले आहे. महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी राजीनामा दिल्याने महामंडलेश्वर आखाड्यात आणि सिनेसृष्टीतही याची चर्चा रंगली आहे.
गतवर्षी महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्यातून ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पद देऊन श्री यमाई ममता नंदगिरी नाव देण्यात आलं होतं. एबीपी न्यूजला एक दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परखड भूमिका मांडली होती. भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे भाजप किंवा कुणाचा एजंट होणे नाही, लवकरच मी भगवे वस्त्र काढून टाकेल, असे ममता कुलकर्णी यांनी म्हटले होते. ममता कुलकर्णी यांनी पत्र लिहून आपल्या राजीनाम्याबाबत कळवलं आहे.
“मी ममता मुकुंद कुलकर्णी, पूर्णपणे शुद्धीत आणि खंबीर मानसिक स्थितीत असून मी 27 जानेवारी 2026 रोजी आपल्या ‘किन्नर आखाडा’ येथील ‘महामंडलेश्वर’ या पदाचा राजीनामा देत आहे. डॉ.आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, मला त्यांच्याबद्दल प्रेम व आदरच आहे. मुद्दा फक्त इतकाच आहे की, माझे आध्यात्मिक ज्ञान आता जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांप्रमाणे प्रवाही असेल, सत्याला कोणत्याही वस्त्राची किंवा प्रतिमेची (मूर्तीची) आवश्यकता नसते. माझे गुरू श्री चैतन्य गगनगिरी नाथ यांनी कधीही कोणतेही पद स्वीकारले नाही, मी 25 वर्षे आध्यात्मिक जीवन जगले आहे. अंतर्मुख होऊन माझा सराव जसा पूर्वी सुरू होता, तसाच तो आताही सुरू राहील. जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा मी कोणत्याही पक्षाशी, विशिष्ट गटाशी किंवा समविचारी लोकांशी जोडून न घेता माझे ज्ञान सर्वांशी शेअर करेन, असे ममता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे
