माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
पालघर : माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. पालघर) यांनी मालमत्ता कर माफी व मालमत्ता नोंदीतील त्रुटींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय, मोरेकुरण रोड, पालघर येथे २३ जानेवारी पासून अन्न व पाणी त्याग करत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज पाच दिवस असून अद्याप कोणताही ठोस न्याय मिळालेला नाही. डॉ. तायडे यांनी १९ वर्षे देशसेवा केल्यानंतर पालघर येथे स्वतःचे घर बांधले आहे. नगर परिषद पालघरकडून घर बांधण्याची परवानगी व भोगवटा मिळालेला असून १ जुलै २००९ रोजी त्यांनी पहिला मालमत्ता करही भरलेला आहे. त्यांची मालमत्ता क्रमांक जुना ४०२१, सी झोन, पालघर पूर्व अशी आहे.
माजी सैनिकांना मालमत्ता कर माफी मिळावी, यासाठी त्यांनी २३ फेब्रुवारी २०११ रोजी तसेच त्यानंतर वारंवार नगर परिषद पालघर, नगराध्यक्ष व नगरसेवकांकडे निवेदने सादर केली. यावेळी कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर महापालिकांचे माजी सैनिकांना करमाफीचे आदेशही त्यांनी सादर केले होते. मात्र, २०११ पासून आजतागायत नगर परिषद पालघरने त्यांना एकदाही मालमत्ता कराची मागणीपत्रे (बिले) दिलेली नाहीत. तसेच कर माफी न देता त्यांची मालमत्ता संगणक व दप्तरी नोंदीतून गहाळ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय घोलवीरा येथे असलेल्या त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेबाबत नगर परिषदेकडून दोन वेगवेगळ्या मालमत्ता दाखवण्यात आल्या असून त्या प्रत्यक्ष जागेवर दाखवून त्यांच्या ताब्यात द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
या अन्यायाच्या विरोधात त्यांनी यापूर्वी १३ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर येथील हुतात्मा चौकात आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी स्वतः पुढाकार घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, मनीषा निमकर यांच्यासह विविध राजकीय प्रतिनिधी, नगर परिषद अधिकारी व पत्रकार उपस्थित होते. मात्र, ऑगस्ट २०२५ पासून आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे डॉ. तायडे यांनी सांगितले.
उपोषणादरम्यान २५ जानेवारीला रात्री डॉक्टरांनी तपासणी केली असता बीपी व शुगर सामान्य असल्याचे निदर्शनास आले. तरीही पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, प्रजासत्ताक दिनी सैनिकांवर दडपशाही व हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “२०११ पासूनच्या करमाफीच्या निवेदनांचा निपटारा होईपर्यंत आणि घोलवीरा येथील दोन्ही मालमत्ता माझ्या ताब्यात देईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा डॉ. तायडे यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन व नगर परिषद पालघर यांची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
