मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून

भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच

स्वाती घोसाळकर

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीने काठावरचे बहुमत मिळवले. बहुमताचा हाँ आकडा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं पक्षाने स्वतंत्र गट नोंदणी न करता महायुती म्हणून एकत्र नोंदणी करावी असा प्रस्ताव भाजपाकडून शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आला आहे. याबाबतचा गोंधळ कायम असून सलग दुसऱ्यांदा शिंदेंकडून गट नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

आज गटनोंदणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजयी २९ उमेदवारांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बसही बुक करण्यात आली होती. पण शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

गटनेतेपद भाजपला आणि प्रतोदपद शिंदेसेनेला असा प्रस्ताव शिंदेसेनेला पाठवला गेल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिकेत भाजपला ८९, तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. या आकड्यांच्या जोरावर स्थायी समितीवर भाजपचे १०, तर शिंदेसेनेचे ३ सदस्य असतील. स्थायी समितीत एकूण २६ सदस्य असतात. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र नोंदणी केल्यास स्थायी समितीत दोघांचं संख्याबळ १३ असेल. अशा परिस्थितीत २६ सदस्यीय समितीत विविध प्रस्ताव पारित करुन घेताना महायुतीची दमछाक होईल. त्यामुळेच दोन्ही पक्ष एकच गट म्हणून नोंदणी करण्याच्या तयारीत आहेत.
भाजप आणि शिंदेसेनेनं एकत्रित गटनोंदणी केल्यास स्थायी समितीत त्यांचं संख्याबळ मजबूत असेल. याचा फायदा त्यांना महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करुन घेताना होईल. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटींचा आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात. त्यामुळे स्थायी समितीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *