मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन
राजीव चंदने
मुरबाड : गुरूप्रतिपदेच्या पर्वकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळाच्या विद्यमाने भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, २ फेब्रुवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी या कालखंडात आयोजित करण्यात आला आहे. इ.स. १९९८ साली गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम दादा जोशी यांनी अनुष्ठानपूर्वक सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ मुरबाडच्या मातीत रोवली. यावर्षी पारायण सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष आहे.
आचार्य अशोकभाई खरे , निलेश जोशी आणि योगी फुलनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत पारायण सोहळ्याचा प्रारंभ होईल.पारायण नेतृत्व श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप आणि पारायणाचार्य,एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.सदर उत्सवात पुणे येथील वेदमूर्ती शमंदारशास्त्री खळदकर यांची दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रीरामरक्षा या विषयावर प्रवचने होणार आहेत.रोज रात्री आठ ते दहा या वेळेत सर्वश्री विक्रांत महाराज पोंडेकर,जयेश महाराज भाग्यवंत,सुभाष महाराज गेठे,माधवदास महाराज राठी,भगीरथ महाराज काळे,ओंकार महाराज दुडे,आचार्य डॉ.रामकृष्णमहाराज लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत.दिनांक आठ फेब्रुवारीला भव्य पालखी सोहळा आणि दिव्य असा दीपोत्सव संपन्न होईल. सोमवार दिनांक नऊ रोजी वैष्णवभूषण श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.या महोत्सवात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.या धर्मकार्यात भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच सोहळ्यात उपस्थित राहून भक्तिसुखाचा आनंद लुटावा असे आवाहन उपरोक्त मंडळाने केले आहे.
