लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती
आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी स्मारक रुग्णालयासाठी ऐतिहासिक निर्णय
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील कामगारांच्या दिर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच लाड पागे अंतर्गत नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, लाड पागे वारसाहक्काने ६ कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय जाहीर झाला.
लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सन २०१५ पासून सुरू होता. अथक पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील एकूण ७८ रिक्त पदांवर सफाई कामगारांच्या पात्र वारसांना नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय, श्रमिक उत्कर्ष सभा आणि महात्मा गांधी स्मारक कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला आहे.
या विषयावर आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला होता. त्याच प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून, २०१५ पासून प्रलंबित असलेल्या ६ पात्र वारसांना प्रजासत्ताक दिनी अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट आश्वासन दिले की, येत्या एका महिन्यात उर्वरित ७८ पैकी सर्व रिक्त पदांवर लाड-पागे समिती अंतर्गत पात्र वारसांची नियुक्ती केली जाईल. या निर्णयामुळे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांच्या जागी आता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त होणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षित भविष्य मिळणार आहे. महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियन (मान्यताप्राप्त) च्या कामगार बांधवांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद असून, सेवा, संवेदना व सामाजिक न्यायाचा आदर्श या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आमदार लाड यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर रिवणकर, डॉ. शिवकुमार भाले, डॉ. संजय असुर्लेकर, डॉ. जितेंद्र पाटील तसेच संघटनेचे सचिव दिपक गोडे उपस्थित होते. या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांना न्याय मिळाला असून, सामाजिक बांधिलकीची जबाबदारी शासन व प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीत प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली
२०१५ साली अंतिम झालेल्या लाड पागे वारसांची यादी प्रथम अंमलात आणावी.
व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या वारसांवर अन्याय होऊ नये.
वयाची अट शिथिल करून पात्र वारसांना नियुक्ती द्यावी.
सामाजिक जबाबदारी (आईवर अवलंबित्व, कौटुंबिक परिस्थिती) लक्षात घेऊन मानवी दृष्टिकोन ठेवावा.
अनुकंपा वारसांपैकी सफाई कामगार व जातीचे प्रमाणपत्र असलेल्यांना लाड पागे समिती अंतर्गत समाविष्ट करून तातडीने न्याय द्यावा. अनुकंपा वारसांची २०१५ ची ज्येष्ठता कायम ठेवून नियुक्तीचा विचार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *