लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार धनंजय जाधव यांचा सन्मान
अशोक गायकवाड
रायगड- कर्जत: लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवमतदारांनी युवक-युवती तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी व मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (१८९ कर्जत) म्हणून तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत मतदार यादीचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. युवक, महिला व दिव्यांग नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *