शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याची
परवानगी द्याच… आम्ही तयार आहोत
नरेश म्हस्केंचा भाजप प्रदेशाध्यक्षांवर ‘लेटर बॉम्ब’ ठाणे : भाजपाने परवानगी दिली तर, यांचे नामोनिशाण मिटवून टाकीन, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसापूर्वी केले होते. याचा खरपूस समाचार घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट लेटर बॉम्बच टाकला आहे. शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमचीही तयारी आहे. असे पत्र लिहून सेनेने एक प्रकारे गणेश नाईक यांना इशारा दिला आहे.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला होता. यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली होती. भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करू अशा शब्दात थेट टीका केली होती. एकीकडे पालिका निवडणुका संपल्या असताना हा वाद मिटला असल्याचे दिसत असताना गणेश नाईक यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले. आपल्या अकलेचे तारे तोडत नाईकांनी शिंदे यांचे नाव न घेता पुन्हा टीका केली होती.
नरेश म्हस्के यांनी पत्रात काय म्हंटले आहे ?
पत्रास कारण की, नवी मुंबईतील आपले ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी आपले मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महापालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युतीत लढून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपविण्याचा विडा उचलला आहे. एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक साहेब यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेकदा प्रसारमाध्यमातून जाहीररित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे बेताल वक्तव्य केले आहे.मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की, त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमचीही तयारी आहे.
