एका दादा माणसाचे धक्कादायक जाणे!
अजितदादा अनंतराव पवारांसारखा इतका निर्भीड, स्पष्टवक्ता व कोणालाही अंगावर घेण्याची तयारी असणारा फायटर नेता, इतक्या भीषण पद्धतीने नाहिसा व्हावा, हे दुर्दैवी तर आहेच. पण त्याही पेक्षा धक्दायक आहे. याच कंपनीच्या अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका विमानाला मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. १४ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या त्या अपघाततातही उतरताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि आग लागली, दोन तुकडे झाले. पण त्या अपघातात विषाखापट्टणहून मुंबईकडे निघालेल्या सर्व सहा लोकांचे प्राण वाचले. जखमी झाले, पण जीव गेले नाहीत. आज मात्र विमान उतरताना धावपट्टीला घासत गेले, क्रॅश लँडिंगच्या प्रयत्नात अपघात झाला आणि त्यात पाच जणांचा जीव मात्र गेला. अजितदादा पवारांचे असे अचानक नाहिसे होणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक तर आहेच पण महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल परिणाम करणारी अशी ही घटना आहे. लाखांचा पोशिंदा गेला, शेकडो राजकीय नेत्यांच्या प्रगतीचा आधराही गेला. असंख्य कार्यकर्ते आज पोरके झाले. हीच भावना विशेषतः पुणे जिल्ह्यात व्यक्त होते आहे. दादा गेले तेंव्हा त्यांचे वय ६७ होते. म्हणजे राजकारणात फार नाही. त्यांच्या पुढे आणखी किमान पंधरा वर्षांची भरभराटीची राजकीय वाटचाल नक्कीच होती.
अजितदादा अनंतराव पवारांसारखा इतका निर्भीड, स्पष्टवक्ता व कोणालाही अंगावर घेण्याची तयारी असणारा फायटर नेता, इतक्या भीषण पद्धतीने नाहिसा व्हावा, हे दुर्दैवी तर आहेच. पण त्याही पेक्षा धक्दायक आहे. याच कंपनीच्या अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका विमानाला मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. १४ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या त्या अपघाततातही उतरताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि आग लागली, दोन तुकडे झाले. पण त्या अपघातात विषाखापट्टणहून मुंबईकडे निघालेल्या सर्व सहा लोकांचे प्राण वाचले. जखमी झाले, पण जीव गेले नाहीत. आज मात्र विमान उतरताना धावपट्टीला घासत गेले, क्रॅश लँडिंगच्या प्रयत्नात अपघात झाला आणि त्यात पाच जणांचा जीव मात्र गेला. अजितदादा पवारांचे असे अचानक नाहिसे होणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक तर आहेच पण महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल परिणाम करणारी अशी ही घटना आहे. लाखांचा पोशिंदा गेला, शेकडो राजकीय नेत्यांच्या प्रगतीचा आधराही गेला. असंख्य कार्यकर्ते आज पोरके झाले. हीच भावना विशेषतः पुणे जिल्ह्यात व्यक्त होते आहे. दादा गेले तेंव्हा त्यांचे वय ६७ होते. म्हणजे राजकारणात फार नाही. त्यांच्या पुढे आणखी किमान पंधरा वर्षांची भरभराटीची राजकीय वाटचाल नक्कीच होती.
असाच धक्कादायक मृत्यु गोपिनाथ मुंडेंचा, २०१४ मध्ये झाला, तेंव्हा ते ६४ वर्षांचे होते. दोन दिवस आधी त्यांनी देशाचे ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका त्या नंतरच्या चार महिन्यांत होणार होत्या. त्यात भाजपाचे सरकार येणार हे सर्वांनीच मान्य केले होते. “तुम्हालाच महाराष्ट्र सांभाळायचा आहे”, असे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंडेंना सांगितले होते. पण ३ जूनच्या भल्या सकाळी, दिल्लीत अचानक, अकल्पित मोटार अपघातात त्यांचे निधन झाले.
मुंडे साहेबांप्रमाणेच अजितदादा हेही राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणूनच स्वतःकडे पाहात होते. राज्याच्या सर्वोच्चपदाची त्यांची महत्वाकांक्षा त्यांनी गेली दहा पंधरा वर्षे जपली होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कालवधीत, २००४ च्या निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्रीपदावर बसणे शक्य होते. तशी संधी निकालांनी नक्कीच दिली होती. पण शरद पवारांनी ती सोडून दिली. का? हे त्यांचे त्यांनाच माहिती! तेंव्हा जे नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, त्यात छगन भुजबळ, आर आर पाटील यांच्या बरोबरीने अजितदादांचेही नाव होतेच. आमदारांचा कौल जर शरद पवारांनी घेतला असता तर नक्कीच दादांना सर्वाधिक पसंती लाभली असती. पण त्या पदाने दादांना तेंव्हा हुलकावणी दिली.
त्या नंतरच्या २००९ व २०१४ च्या निवडणुकांतही ती संधी दादांना कदाचित खेचून घेता आली असती. पण नाही जमले. आता २०२९ ची वाट ते पाहात असतील का ? मनातल्या मनात नक्कीच! पण राज्यातील सर्वच राजकीय पक्षांपुढे सध्या भाजपा हेच मोठे आव्हान आहे. भाजपा पेक्षा अधिक आमदार निवडून आणावे लागणार, ते कसे पूर्ण होणार हा प्रश्न दादांनाही पडलेलाच असणार. ते म्हणायचे की मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा, महत्वाकांक्षा नक्कीच आहे. पण ज्या दिवशी माझ्या मागे १४५ आमदार असतील तेंव्हाच मी होऊ शकेन.
दादांना एक रुखरूख नक्कीच होती. ती म्हणजे २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी जशी संधी घेतली तशी आपल्याला घेता आली नाही. अजितदादांनी जर शिंदेंच्या आधी मविआ मधून बाहेर पडण्याचे धाडस केले असते, तर कदाचित मुख्यमंत्रीपदाची माळ दादांच्या गळ्यात पडली असती. भाजपाने त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची संधी तेंव्हा दिली असती. संधी येणे, संधी घेणे व संधी शोधणे यात अजितदादांना नशिबाने साथ दिली नाही हेच खरे.
शिंदेही खरेतर ४० आमदार घेऊनच बाहेर पडेल होते. भाजपाकडे तेंव्हाही १०५ स्वतःचे आणि चार अपक्ष असे १०९ आमदार होतेच. पण मुख्यमंत्रीपद त्यांनी शिंदेंना दिले. अजितदादाही चाळीसच आमदार घेऊन शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडले होते!! पण मध्ये एक वर्षाचा अवधी गेला होता. आणि तोच संधी हुकवणारा ठरला होता.
अजितदादा व वाद, आरोप हेही समिकरण महाराष्ट्रात सतत पाहिले आहे. ते उपमुख्यमंत्री बनले तेंव्हा पासून, म्हणजे २००९ पासून, अजितदादांच्या मागे आरोपांचे शुक्लकाष्ट लागणे सुरु झाले. जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारां नंतरचे महाराष्ट्राचे मुख्य नेते अजितदादा हेच राहणार हे निश्चित झाले होते. तेंव्हापसून अण्णा हजारे, भाजपाचे एकनाथ खडसे, विनोद तावडे असे नेते, अंजली दमानियां सारखे समाजिक कार्यकर्ते असे सारेच दादांच्या मागे लागले. अजितदादांवरच ठपका यावा अशा पद्धतीने, जलसंपदा खात्याच्या कामांची चौकशी, सिंचन नेमके किती वाढले याची श्वेतपत्रिका, विविध धरणे व पाटबंधारे प्रकल्पांत अपेक्षे पेक्षा अधिक खर्च झाल्याचे जे आरोप होत होते, त्यांना पुष्टी मिळावी अशा प्रकारची प्रशासकीय पावले तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी टाकली. त्याचा मोठा ताप दादांना झाला.
त्यातच कार्यकर्त्यांना खुष करणारी, ग्रामीण ढंगाची भाषा, चुकीचे वाक्प्रचार वापरल्यामुळेही, दादा त्याच २००९ – २०१४ कालाधीत अडचणीत आले. धरणाचे पाणी वाढवण्याची अजितादादांची उक्ती ही समाज माध्यमांवर नेहमीच ‘मीम’कारक व व्यंग टिप्पणीची धनी झाली. त्या वायफळ बोलण्याचा पश्चाताप झाला तेंव्हा दादांनी मौन पाळले. ते कराडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपुढे दिवसभर बसले. आत्मक्लेषाचा गांधी मार्ग त्यांनी अनुसरला. पण समाजाने त्यांना त्या बाबतीत कधीच माफी दिली नाही. आजही दादा म्हटले की ते धरणाचे पाणी लोकांना आठवते. त्यांचे कडवट बोलणेही आठवते.
खरेतर शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण म्हणत असत, तेच तर दादांनी अंमलात आणले होते. चव्हाण साहेब म्हणत की, “ सरकारच्या अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकावे व राजकीय पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकावे”. दादा काय निराळे करत होते! स्पष्ट व थेट नाही म्हणणे हीच तर अजित पवारांची खासियत होती!! उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी, नियमात न बसणाऱ्या कामांसाठी मंत्र्यांच्या गळी पडण्याचे कार्यकर्त्यांचे उद्योग टाळण्यासाठी, त्यांचे नको ते आग्रह मोडण्यासाठी एकमेव बाण असायचा तो म्हणजे, अजित पवारांचा कडवट व कटू शब्द. बोचणारी स्पष्ट भाषा. एखादे काम होणारे नसेल तर ते कार्यकर्त्याला वा आमदारांनाही स्पष्ट शब्दात दादा सुनावत असत. व ते लोकांना पुष्कळ रुचतही असे. लोक म्हणत, “दादा जेंव्हा म्हणतात काम होणार नाही, तेंव्हा ते खरेच होण्या सारखे नसते.”
सकाळी सातला उठून कामाला लागणे ही थोरल्या पवारांची सवय दादांनी पूर्णपणाने आत्मसात केली होती. सात वाजता ते स्वतःचे आटोपून, ब्रेकफास्ट वगैरे उरकून, दोन चार अधिकाऱ्यांना कामांच्या सूचना देऊन, नंतर गाडीत बसायला तयार असत आणि रात्री उशिरापर्यंत कामासाठी बैठकांसाठी, सभांसाठी जागरणे करणे हेही नित्याचेच होते. देशात मोदी जसे व जितके काम करतात, तितके व तसे काम कदाचित अजितदादा हेच, राज्यात करत असत.
२०१९ च्या निवडणुकी नंतरच्या सरकार स्थापनेच्या धामधुमीत घडलेल्या काही धक्कादायक घटना, याही दादांच्या निराळ्या, स्पष्ट राजकारणाची साक्ष देणाऱ्या होत्या. २०१९ ला जेंव्हा शरद पवारांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र सरकार करण्याचा विचार केला व काँग्रेसचे मन वळवले तेंव्हा ज्या बैठका यशवंतराव चव्हाण केंद्रात, वरळीला नेहरु सेंटरला रंगत होत्या, त्याच वेळी अजितदादांना सवता सभा मांडायचा होता. त्यांनी वर्षा बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. चर्चा केल्या. फडणवीसांनी दादांच्या, प्रपोजलसाठी, दिल्लीची मान्यता घेतली. तेंव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते. त्यांच्या सहमतीने भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारचा प्रस्ताव दिल्लीत गेला. राष्ट्रपती राजवट उठवण्याची पावले केंद्र सरकारने रातोरात उचलली. पहाटेचा म्हणून गाजलेला शपथविधी २३ नोंव्हेंबर २०१९ रोजी सकाळी सात साडेसात वाजता पार पडला. पण त्या आधी तयारीसाठी वर्षा बंगला व राजभवन रात्रभर जागे होते.
ते सरकार अर्थातच अल्पजीवी ठरले. कारण ठाकरेंनी तातडीने सर्वोच्च न्यायायलयात धाव घेतली. अजितदादां बरोबर जायला तयार झालेले धनंजय मुंडे वगैरे आमदार शरद पवारांचे वटारलेले डोळे पाहून माघारी फिरले आणि सर्वोच्च न्यायालयाने नव्या विधानसभा सत्राचा जो कार्यक्रम सरकार सुचवत होते, तो बदलून टाकला. फडणवीस व अजितदादांची योजना होती की आधी विधानसभेचा अध्यक्ष निवडायचा. ते मतदान गुप्त असते व त्याच वेळी अनेक राष्ट्रवादीचे तसेच शिवेसनेचे अनेक आमदार सरकारच्या बाजूने क्रॉसव्होटिंग करून भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडून देतील. पण ती रणनीती फसली. कारण, न्यायालयाने आदेश दिला की खुल्या मतदानाने आधी सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. नंतरच विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल. गुप्त मतदान हा फडणवीस-दादांच्या ऱणनीतीचा मुख्य आधार होता. तोच कोसळल्यावर दोघेही राजीनामे देऊन मोकळे झाले. ते सरकार अडीच दिवस टिकले.
शरद पवारांपासून दूर झाणे हे दादांनाही जडच जात असावे. त्यांच्या मनात २०२३ च्या पक्षफुटीची मोठी खंत होती व ती ते कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखवत असत. परवाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत ते काकांच्या पक्षाच्या भरपूर जवळ गेले. पुणे व पिंपरी चिंचवडसह काही ठिकाणी त्यांची राजकीय आघाडी झाली होती. दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण समोर दिसत असल्याचे दोन्हीकडचे नेते उघड बोलू लागले होते. कुटुंब म्हणून अजितदादा पवार व काका शरद पवार यांचे सख्य गेल्या दोन वर्षात पुन्हा प्रस्थापित झालेच होते. आता ते राजकारणातही एकत्र येण्याच्या टप्प्यावर पोचले होते.
पण आता जर दादाच राहिले नाहीत तर काय होईल? दादांचे कार्यकर्ते पुन्हा शरद पवारांसोबत जातील. काहींना भाजपा वा काँग्रेसचा आसरा अधिक बरा वाटेल.
राज्याने एकूण आठ दहा उपमुख्यमंत्री पाहिले. त्यातली सहा वेळेस अजितदादा हेच उपमुख्यमंत्री राहिले. त्यातही अर्थ व नियोजन हीच खाती त्यांनी सातत्याने सांभाळली. सर्वाधिक वेळेस राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे वित्तमंत्री हे बिरूद त्यांनी मागच्या, २०२५ च्या अर्थसंकल्पा वेळीच धारण केले होते. आता २०२६ चा विक्रमी अर्थसंकल्प मांडण्याची त्यांची संधी नियतीने हिरावून घेतली आहे. पुष्कळ शक्यता, असंख्य विकासाच्या संकल्पना आणि हजारो कार्यकर्त्यांची स्वप्ने सोबत घेऊन अजितदादा पवार हे अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहे. त्यांना आदरांजली.
श्रध्दाजंली
अनिकेत जोशी
