महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पळविण्याचा अजब प्रकार
अर्ज मागे घेण्याची ऑफर आणि तहसील कार्यालयाबाहेर तणावग्रस्त परीस्थिती
राज भंडारी
पनवेल : राज्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका चांगल्याच रंगात आल्या असताना आज मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असतानाच पनवेलमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला. तालुक्यातील आदई पंचायत समिती गणातून भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार विलास फडके आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवार अनिता डांगरकर हे दोन उमेदवार मैत्रीपूर्ण लढत असतानाच शिवसेनेच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना विरोधकांकडून १५ लाख रुपयांचे अमिष देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सांगण्यात आल्याचे कारण देत तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी पोलिसांशी देखील हुज्जत घालण्याचा प्रकार करण्यात आला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले. काही क्षणातच महाविकास आघाडीचे सर्व नेते देखील याठिकाणी हजर झाले. नितीन ठाकरे यांनी नेत्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याबाबत मध्यस्थी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढत न लढण्याचा निर्णय घेत शिवसेना उबाठाच्या अनिता डांगरकर यांचा अर्ज महाविकास आघाडीच्यावातीने मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम उद्भवणार नसल्याचे देखील सांगण्यात आले. त्यामुळे आदई पंचायत समिती गणातून आता थेट लढत ही शेकापचे अधिकृत उमेदवार विलास फडके आणि भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्यात होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
