कर्तव्यापलीकडचा त्याग
महाराष्ट्र पोलिस भावाने यकृतदान करून धाकट्या भावाला दिले नवे आयुष्य
कल्याण : कर्तव्य, प्रेम आणि बंधुत्व यांचा विलक्षण संगम दाखवणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान करत माणुसकीचा सर्वोच्च आदर्श घालून दिला. रस्त्यावर गुन्हेगारीशी लढणारे शौर्य कधी कधी ऑपरेशन थिएटरमध्येही दिसून येते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
३८ वर्षीय नित्यानंद रोकडे याला ‘अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअर’मुळे अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीव्र पिवळेपणा, व्हेंटिलेटरचा आधार आणि रक्तदाब सांभाळण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची स्थिती होती. त्याच्या जीविताची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण. अशा वेळी महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ संतोष रोकडे कोणताही क्षण दवडला न जाता जिवंत दाता म्हणून पुढे आला.
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात डॉ. स्वप्निल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत गुंतागुंतीची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले. शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, विशेष प्रशिक्षित आयसीयु परिचारिका, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या समन्वयातून ही जीवनदायी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या निर्णयाबद्दल बोलताना संतोष रोकडे म्हणाले, “पोलिस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण यावेळी प्रश्न वर्दीचा नव्हता, तर माझ्या भावाचा होता. मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत होतो, तर कोणताही विचार करण्याची गरजच नव्हती.” डॉ. स्वप्निल शर्मा यांनी सांगितले, “अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही अतिशय आव्हानात्मक शस्त्रक्रिया असते. या प्रकरणात वैद्यकीय कौशल्यासोबतच दोन भावांचे असामान्य मानसिक बळ आम्हाला सतत प्रेरणा देत होते. प्रेम, त्याग आणि विज्ञान यांच्या संगमातून मृत्यूवर मात केलेली ही दुर्मीळ घटना आहे.” प्रकृतीत सुधारणा होत असलेला नित्यानंद भावूक होत म्हणाला, “माझे आयुष्य मी भावामुळे मिळवले आहे. यावेळी त्याने मला पोलिस म्हणून नाही, तर कुटुंबातील सदस्य म्हणून वाचवले. हे ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.”
सध्या दोन्ही भाऊ बरे होण्याच्या मार्गावर असून, एक पुन्हा निरोगी आयुष्याकडे वाटचाल करत आहे, तर दुसरा पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याच्या तयारीत आहे. आधुनिक वैद्यकीय प्रगती, योग्य वेळी केलेला निर्णय आणि भावाने केलेला असामान्य त्याग — यामुळे एक जीव वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *