कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा!
नाशिकमध्ये ४ फेब्रुवारीला जनआक्रोश मोर्चा
हरिभाऊ लाखे
नाशिक – प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी शिव-फुले-शाहू आणि आंबेडकरी विचारांच्या नागरिकांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता. यावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संविधान निर्माण करणाऱ्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात, असा प्रश्न जाधव यांनी करीत महाजन यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अनवधानाने नाव राहिल्याबद्दल मंत्री महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, शिव-फुले-शाहू आणि आंबेडकर विचारांच्या संघटना, पक्ष तसेच नागरिकांची हुतात्मा स्मारकात बैठक पार पडली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मोर्चाचे आयोजक म्हणून ‘आम्ही भारताचे लोक-नाशिककर’ हे नाव सर्वानुमते ठरविण्यात आले. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात मोर्चाच्या परवानगीसाठीचे पत्र देण्यात आले. यावेळी तल्हा शेख, किरण मोहिते, प्राजक्ता कापडणे, अरूण काळे, शफिक शेख, दीपक पगारे, दीपक डोके आदी उपस्थित होते.४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येईल, असे आयोजकांनी म्हटले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, भीमवाडी, नाशिक रोड बुद्ध विहार, फुलेनगर, सिडकोतील मायको सभागृह, सातपूर येथील राजवाडा या ठिकाणी विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातून लोक मोर्चात सहभागी होतील.
प्रजासत्ताक दिनी हेतूपुरस्सर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, महापुरूषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार परत घ्यावा, प्रजासत्ताक दिनी मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या वनरक्षक भारती जाधव आणि दर्शना सौपुरे यांना दिलेल्या वागणुकीची चौकशी करावी, आदी मागण्या मोर्चातून केल्या जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मंत्री महाजन हे कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेच्या नावाखाली तपोवनातील वृक्षतोडीचा घाट घालत असून अशा व्यक्तीला संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *