बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
“भविष्यासाठी शाश्वत प्रगती” या संकल्पनेवर दोन दिवसीय शास्त्रीय मंथन
मुंबई : विद्या प्रसारक मंडळ संचलित बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने उपयोजित प्राणीशास्त्रावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २३ व २४ जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडली. “भविष्यासाठी शाश्वत प्रगती” ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती.
परिषदेचे उद्घाटन थोरले बाजीराव पेशवे सभागृहात झाले. यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, लॅब इंडिया प्रा. लि. चे श्रीकांत बापट, हायमीडिया लॅबोरेटरीजचे डॉ. राहुल वारके आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. विंदा मांजरमकर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात प्रा. डॉ. विंदा मांजरमकर यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात उपयोजित प्राणीशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
या परिषदेत एकूण १० ऑफलाईन व २ ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी फ्लोरिडा विद्यापीठातील डॉ. लॉरेन एम. डायपेनब्रॉक, प्रा. डॉ. प्रताप माळी, प्रा. डॉ. अरुण खरात आणि डॉ. धीरज धोत्रे यांनी विविध समकालीन विषयांवर मार्गदर्शन केले. येमेन आणि कझाकस्तान येथील तज्ज्ञांनीही ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी नेदरलँड्स येथील प्रा. तेज मुंडकुर यांनी पक्ष्यांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले, तर प्रा. डॉ. शैल के. चौबे यांनी सस्तन प्राण्यांच्या पुनरुत्पादनावर पर्यावरणीय ताणतणावांचा परिणाम स्पष्ट केला. समारोप सत्रास डॉ. अरविंद इंगळे (ACTREC) आणि भालचंद्रसिंग रावराणे हे प्रमुख पाहुणे होते. परिषदेत १२ नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी मार्गदर्शन केले. *डॉ. किरण परिया, डॉ. अभय मोराजकर, डॉ. निलेश जवळकर यांच्यासह विभागातील प्राध्यापकांनी उत्कृष्ट समन्वय साधत परिषदेचे आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *