७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – तेलंगणा, २०२६.
महाराष्ट्राच्या महिला उप उपांत्य फेरीत
मुंबई:- महाराष्ट्राच्या महिला संघाने “७२वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उप उपांत्य फेरी गाठली. तेलंगणा येथील गच्ची बोवली बंदिस्त क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या उपउपांत्यापूर्व सामन्यात महाराष्ट्राने आज गोवा संघाला ४२-३६ असे नमविले. सुरुवातीला थोडी झटपट पहावयास मिळाली. पण पहिला लोण देत महाराष्ट्राने १९-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीला महाराष्ट्राकडे २५-१४ अशी आघाडी होती. विश्रांती नंतर आणखी एक लोण देत महाराष्ट्राने आपली आघाडी ३२-१५ अशी वाढविली. या नंतर गोव्याने गतीमान खेळ करीत महाराष्ट्रावर लोण देत ३०-४० अशी आघाडी कमी केली. शेवटी महाराष्ट्राने ६ गुणांनी बाजी मारली. आम्रपाली गलांडे, याशिका पुजारी, निकिता पडवळ याच्या दमदार चढाया त्यांना समृद्धी मोहिते, समरीन बुरोंडकर, ज्यूली मिस्कीटा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळविला.
महाराष्ट्राचा या स्पर्धेत ई गटात समावेश होता. त्या गटात छत्तीसगड, विदर्भ व केरळ हे अन्य संघ होते. महाराष्ट्राने प्रथम विदर्भला ५७-२० असे, त्या नंतर छत्तीसगडला ४२-१९ असे, तर शेवटी केरळला ५७-११ असे पराभूत करीत या गटात अव्वल स्थान मिळविले होते.
