महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर जागृती
कोकण कृषी विद्यापीठात लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यक्रम
अशोक गायकवाड
रत्नागिरी: राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने “महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण” या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष विष्णू सावर्डेकर हे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, कोणती कृत्ये लैंगिक छळाच्या व्याख्येत येतात, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी लैगिक छळ होत असल्यास महिलांनी कोणती पावले उचलावीत, तक्रार कशी करावी, याबाबतही माहिती दिली. लैगिक छळ तक्रार निवारण समितीची रचना, तिची कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी तसेच महिला व पुरुष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *