रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी?
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टोकावडे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता, एम. एच १४ – सि. पी ७3४७ या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचे दिसून आले. ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आले, धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाली. धान्य व्यापाराकडे धान्य व गव्हाचे परवाना नसल्याचे समजले, तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नर कडे काळया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रथमदर्शनी समजले. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे.
टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहे अशी माहिती मिळाली. पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशनिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का? असा सवाल करत आदिवासी क्रांति सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी मा . जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचे आमच्या दै, बित्तंबातमीचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *